जेष्ठ चित्रकार व सुप्रसिद्ध मूर्तिकार कराडचे भूषण दादासाहेब सुतार सर यांच्या लेखणीतून साभार...

कराड येथील ‘उत्तरालक्ष्मी’ मंदिरातील ही उत्तलक्ष्मीची मूर्ती मी प्रथम पाहिली, त्यावेळेस मी भारावून गेलो कलाकृतीचा अप्रतिम नमुना असलेली ही मूर्ती आहे. हे लक्षात आले या मूर्तीची अनेक पेंटिंग माझ्या हातून झाली आहेत.एक प्लास्टर मूर्तीही अभ्यासपूर्वक तयार केली. हे करताना पुन्हा पुन्हा चिंतन झाले, अभ्यास झाला आणि आज मूर्ती, तिची प्रतीके, त्यांचे अर्थ असा हा लेख तयार झाला. आपणास तो नक्कीच आवडेल !
● आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे !

।।श्री शक्ती ।।
आदिशक्ती उत्तरालक्ष्मी रूपदर्शन

भ्यासूर आणि सुरेख| हे रूपाचे स्वरूप देख|जे उपजवी सुखदुःख | नेत्राद्वारे |
ज्ञानेश्वरी ,अध्याय दुसरा ,ओवी ||116 ||

शब्द ,स्पर्श, रस ,रूप आणि गंध यांचे अनुक्रमे कान, त्वचा, जीभ ,डोळे आणि नाक या ज्ञानेंन्द्रियाद्वारे माणसाला ज्ञान होते यामध्ये रूपाचं ज्ञान नेत्राद्वारे होते. सर्व जग हे नाम आणि रूपाने भरलेलं आहे. रूपामध्ये प्रथम वस्तूचा आकार येतो. मग आकाराची उजळ- गडद छटा येते त्याचा रंग आणि पोत येतो.मग वस्तू निसर्गनिर्मित असू द्यात अगर मानवनिर्मित या गोष्टीतूनच त्या वस्तूचं रूप तयार झालेलं असतं .रूपामध्ये जसं सुरेखरूप सुंदर रूप असतं तसंच भ्यासूर रूप पण असतं. या दोन्ही रूपांचा वेध चित्रकाराला घ्यावा लागतो म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास चित्रकार रेषा ,आकार ,छायाभेद रंग आणि पोत यांच्या अभ्यासातून व यांच्या ऊत्कृष्ट संयोजनातून कलाकृती निर्माण करतो. देश परदेशातील अनेक चित्रकारांनी जसं सौंदर्यवतींच्या सौंदर्याचे दर्शन आपल्या चित्रातून घडवलं. तसंच जगप्रसिद्ध चित्रकार पाबलो ‘पिकासो’ सारखा चित्रकाराने नवकलेतील प्रतिकांच्या माध्यमातून व आपल्या ‘ग्वेरनिका ‘या चित्रातून युद्धातील भीषणता भयानकता त्यातला भेसूरपणा याचे ‘रूपदर्शन’ सर्व जगाला दाखवून दिले
भारतामध्ये अजिंठा ,वेरूळ सारख्या लेण्यामधून तसेच भव्य दिव्य मंदिरातून अप्रतिम अशा चित्र-शिल्पांची निर्मिती भारतीय कलावंतांनी केली. लयबद्ध आकारातून निर्माण झालेल्या अनेक मूर्ती भारतीय शिल्पातून पाहावयास मिळतात .देवतांना अनेक मुख असणं ,अनेक हात ,हस्तमुद्रा देव-देवतांची वाहन, आयुध ही सर्व प्रतिकरूप आहेत .सर्व देवता तरुण आहेत. भरदार छाती असलेल्या आहेत. सर्व मूर्ती मधून एक अलंकारिक रचना बघायला मिळते. मानवी शरीरातील सौंदर्याचा शोध भारतीय कलावंतांनी घेतला आहे. तसेच शारीरिक सौंदर्याबरोबर प्रतिक रूपाने दैवी शक्तीचेही दर्शन भारतीय कलावंतांनी मूर्तीतून घडविले आहे .तसेच पशुपक्ष्यातील सौंदर्य ही त्यांनी शोधले .देवीदेवता बरोबरच ऋषी, गंधर्व ,पशुपक्षी ,राक्षस प्रतिमाही घडवल्या .
भारतामध्ये सर्व कला मंदिरामध्ये वाढल्या त्या कलांना मंदिराचे पावित्र्य होते. मंदिरामध्ये ढोल, ताशे, चौघडे, सनई इत्यादी वाद्ये वाजविली जात, तसे नृत्यांगना असत. भजन, कीर्तन याबरोबरच ग्रंथ पठण केले जाई. तसे मंदिरासाठी कलावंनी चित्रे काढली .शिल्पे घडवली . परदेशामध्ये देखील, चर्च मधून चित्रे काढली. शिल्पे घडवली गेली .फरक एवढाच की दिसत तसं करण्याकडे त्यांचा कल होता. तसेच अगदी ‘मायकेल एंजलो’ पासुन आज पर्यंतच्या सर्व चित्रावर कलावंतांनी, आपल्या सह्या केल्या आहेत. तर शिल्पावर त्या खोदल्या गेल्या आहेत .
भारतीय कलावंतांनी मात्र दिसतं तसं न करता त्यांना वाटतं तसं चित्रे काढली, तशी शिल्पेही घडवली. भारतीय सर्व शिल्पे अलंकारिक व भौमितिक आकारानी सजवली गेली आहेत. त्यांनी कमळाच्या पाकळीसारखे डोळे काढले आहेत. सिंहकटी कंबर, चाफेकळी सारखे नाक आहे .भारतीय नृत्यशास्त्रावर आधारित अंगविक्षेपातून निर्माण होणाऱ्या नृत्य मुद्रा घेऊन ,समपाद ,आभंग ,त्रिभंग आणि अतिभंग इत्यादी शरीर मुद्रावर मूर्ती घडविल्या .अभय ,वरद ,ज्ञान ,सूची ,कटक ,तर्जनी ,अंजली अशा हस्तमुद्रांचा उपयोग केला देवतांच्या वाहनासाठी सिंह ,व्याघ्र ,नंदी ,मोर इत्यादी पशु पक्षांची योजना केली .किरीट ,मुकुट, कुंडले अशा षोडश अलंकाराने मूर्ती अलंकृत केल्या. त्रिशूल ,खड्ग, डमरू इत्यादी आयुधांचा प्रतिक रूपानी वापर करून नटराजा यासारख्या जगप्रसिद्ध मूर्ती घडविल्या.
अजिंठा ,वेरूळ, खुजराहो कोणार्क सूर्य मंदिरासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे घडविली पण एकाही मंदिरावर केव्हा शिल्पावर कलावंतांनी आपली सही खोदली नाही. याचे कारण करणारा मी नसून, करून घेणारा वेगळा आहे. मी निमित्त मात्र आहे. अशी सर्व भारतीय कलावंतांची भावना होती .
मी चित्रकले बरोबर शिल्पकलेचीही उपासना केली .चित्रकले बरोबर शिल्पकलेची मला लहानपणापासून आवड ,त्यामुळे माती, सिमेंट, दगड, अशा वेगवेगळ्या माध्यमातून काही मूर्ती घडविल्या. त्यामध्ये प्लास्टरमध्ये उत्तरालक्ष्मी, दगडामध्ये काल भैरव ,योगिनी योगेश्वरी (जोगेश्वरी) आई आदिशक्ती रेणुका माता ,विठ्ठल- रखुमाई ज्योतिर्लिंग (केदारेश्वर) यातील दगडी मुर्तींची आज मंदिरातून पूजा होते हे माझे भाग्य. या मूर्ती घडविताना त्यासाठी लागणारी हत्यारे, शिल्प शास्त्रावरील ग्रंथ, त्यामध्ये कश्यप शिल्पम् ,भारतीय शिल्पसंहिता ,भारतीय मूर्ती विज्ञान ,अशा ग्रंथांचा अभ्यास करावा लागला.
ॐ कार स्वरूप भूमी असणाऱ्या कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठावर सोमवार पेठेत आदिशक्ती उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे .कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या प्रीतीसंगमाला लागून वसलेले हे गाव पूर्वी याच कऱ्हाटक नाव होतं. त्यानंतर कऱ्हाड हे झालं. त्यानंतर कराड हे झालं, आज कराड नावाने प्रचलित आहे. हे मंदिर कराड परगण्याचे सुभेदार, श्रीमंत सरदार श्री शिवाजीराव साळुंखे (डुबल) यांनी इसवी सन 1727 साली बांधल्याचा उल्लेख मिळतो. भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे शिल्प, तिथेच मंदिरात बाजूला ठेवून त्याची प्रतिकृती असलेले दुसरे दगडी शिल्प त्या ठिकाणी नुकतेच प्राणप्रतिष्ठित केले आहे. अप्रतिम कलेचा नमुना असलेले मूळ शिल्प हे शिल्पशैलीवरून साधारण अकराव्या ,बाराव्या शतकात घडवले गेले असावे असे वाटते .नवीन प्राणप्रतिष्ठित केलेल्या. या मंदिरातील नवीन मूर्तीची पूजा- आर्च्या श्री. चंद्रहास व देवानंद पुजारी हे बंधूद्वय करतायेत.
सर्वांना आपल्या शिल्प सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या या मूळ शिल्पावरून शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी माझ्याकडून विश्रामबाग वडा ,पुणे येथील चित्र संग्रहालयासाठी साधारण 1980 चे दरम्यानचे सहा फूट बाया चार फूट या आकाराचे तैलीचित्र करून घेतले. त्यानंतर रायगड या पुस्तकासाठी त्यांनी पंधरा बाय बावीस इंच या आकाराचे चित्र, पोस्टर कलर मध्ये करून घेतले या चित्रावरूनच कोयना सिमेंट , कराड या संस्थेचे सेक्रेटरी श्री राजाभाऊ कोटणीस यांनी श्री बाबासाहेब पुरंदरे यांची परवानगी घेऊन त्यांच्या परवानगीने बहुरंगी ग्रीटिंग काढली. ती सर्वांना खूप आवडली. श्री यशवंतरावजी चव्हाण ,श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ,श्री शिवाजीराव भोसले याना खूप आवडली .यांच्या प्रत्यक्ष भेटीत शाबासकीची थाप देऊन माझे खूप कौतुक केले. आईसाहेब सुमित्राराजे भोसले यांनी तर पत्र पाठवून आशीर्वाद दिले. त्यांचा आशीर्वादाचा हात नेहमीच असे. त्यांनी स्वतः एक तैलचित्र (20 इंच बाय 30 इंच) श्रीमंत छत्रपती श्री. अभयसिंह महाराज यांच्यासाठी करून घेतले. अलीकडे 20 18 साली सहा फूट बाय नऊ फूट या आकाराचे तैलचित्र श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी करून घेतले लोहगाव पुणे येथे ते पूर्ण केले .सहा महिने या चित्राचे काम सुरू होते. रेखाटन केल्यावर, फिलिंग केल्यावर व पूर्ण झाल्यावर तीन वेळा ते लोहगावला आले. आल्यावर दोन-तीन तास थांबत वयाच्या 97 व्या वर्षी पर्वती पुणे येथून लोहगावला यावं लागतंय
यासाठी मी दिलगिरी व्यक्त करताच म्हणाले “आई आदिशक्ती उत्तरालक्ष्मी या चित्रासाठी आपण मला दहा वेळा बोलावलं असतं तरी मी आपणाकडे आलो असतो “आईसाहेबांच्या या सहा महिन्याच्या कालावधीचा, चित्र पूर्ण करण्यातला आनंद आवर्णीय होता. मी चित्रमय झालो होतो. याच वेळी गौरव सिद्धे माझा मित्र, बांधकाम व्यावसायिक, याने (चार फूट बाय सहा फूट) या आकाराचे, उत्तर लक्ष्मीचे तैलचित्र माझे कडून करून घेतले .
स्वर तेच आहेत, स्वर-रचना बदलते आणि नवीन स्वर-रचना जन्माला येते. शब्द तेच आहेत शब्द-रचना बदलते आणि एखादं काव्य गद्य पद्य जन्माला येते. असंच चवी त्याच आहेत. खारट, तिखट, तुरट ,आंबट ,गोड ,कडू यांची रचना बदलते आणि वेगळ्या चवीच्या पदार्थाचा जन्म होतो .वास्तू रचनाकार वास्तूशिल्पा साठी लागनारया साहित्यातून तसेच आम्ही चित्रकार रेषा ,आकार ,छायाभेद ,रंग आणि पोत या चित्रकलेच्या मूळ तत्वाचा उपयोग अनाधिकालापासून करीत आलो आहोत. चित्रकार रेषा ,आकार ,छायाभेद ,रंग व पोत यांच एक वेगळ संयोजन आपल्या चित्रात करतात व त्यातून त्यांची शैली व वेगळ चित्र तयार होत. तसेच शिल्पकार माती दगड सिमेंट इत्यादी माध्यमातून आकारांची रचना करीत आले आहेत घरात इस्तत: पडलेल्या वस्तू व्यवस्थित लावल्या की त्याला गृह सजावट म्हणतात .
कोणतीही कलाकृती रचनेने श्रेष्ठ ठरते आणि म्हणून रचनाशास्त्र दृष्टया आदिशक्ति उत्तरलक्ष्मी ही मूर्ती शिल्पकलेचा अजोड नमुना आहे .

About Author

1 Comment

  • best gold ira companies

    1 year ago / December 17, 2023 @ 10:28 pm

    I couldn’t refrain from commenting. Well written!

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *